बॉलिवूडचा नवीन चित्रपट 'सैयारा' सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत असतानाच, याच चित्रपटामुळे मराठी सिनेमा 'येरे येरे पैसा ३' च्या स्क्रीन्स कमी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत संतापाची लाट उसळली असून, मनसेने याला हिंदी सिनेमा समर्थकांचे षडयंत्र ठरवत मल्टिप्लेक्स मालकांना थेट इशारा दिला आहे.
‘येरे येरे पैसा 3’ वंचित, 'सैयारा' ला भरभरून स्क्रीन्स?
राज्यातील काही प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये 'सैयारा' चित्रपटासाठी भरगच्च स्क्रीनिंग ठेवण्यात आल्याने 'येरे येरे पैसा 3' सारख्या मराठी चित्रपटाला मागे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे निर्माते मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर आहेत. त्यामुळे ही संपूर्ण घटना राजकीय रंग घेऊ लागली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत, "मराठी सिनेमाच्या गळचेपीला आम्ही सहन करणार नाही. मल्टिप्लेक्समधील हे धोरण जाणूनबुजून आहे. जर मराठी सिनेमाला हक्काचे स्क्रीन्स दिले नाहीत, तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ,” असा इशारा दिला आहे.
हिंदी-मराठी सिनेमांवरून पुन्हा वाद
हिंदी भाषेचा शालेय अभ्यासक्रमातील सक्तीचा विषय असो किंवा सिनेमागृहांतील भेदभाव – महाराष्ट्रात गेल्या काही काळात हिंदी-मराठी वादाने वारंवार डोके वर काढले आहे. आता 'सैयारा' व 'येरे येरे पैसा 3' प्रकरणामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेच्या आरोपानुसार, 'सैयारा' चित्रपटासाठी स्क्रीन अडवून ठेवण्यात आले, तर दुसरीकडे मराठी सिनेमाला संधीच नाकारण्यात आली. हा प्रकार केवळ व्यावसायिक नसून, राजकीय सूडातून घडवून आणल्याचा आरोप मनसेने केला आहे.
"आमचा सिनेमा दडपण्याचा प्रयत्न सुरू"
“अमेय खोपकर यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे म्हणूनच स्क्रीन कमी करण्यात आले, हे स्पष्टपणे दिसत आहे. मल्टिप्लेक्समधील ही भूमिका पक्षद्वेषातून प्रेरित आहे,” असे संदीप देशपांडे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमा हटवणे, ही केवळ व्यावसायिक रणनीती नाही, तर आमच्या सांस्कृतिक अस्तित्वावर घाला आहे.”
चित्रपट सेनेचा आक्रमक पवित्रा
मनसे चित्रपट सेना यासंदर्भात अधिकृत बैठक घेत असून, त्यानंतर आंदोलनाचे संकेतही दिले आहेत. “जर मराठी सिनेमाला हक्काचे स्थान दिले गेले नाही, तर थिएटर मालकांना जबाबदार धरले जाईल,” असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी सिनेमाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. बॉलिवूडच्या झगमगाटात मराठी चित्रपट दडपले जात असतील, तर त्यास तीव्र विरोध होणारच, असे चित्र आहे. 'सैयारा'च्या यशात 'येरे येरे पैसा 3' च्या संधी हिरावून घेण्यात आल्या असल्याचा आरोप जर खरा ठरला, तर राज्यात चित्रपटांभोवतीचा हिंदी-विरुद्ध-मराठी संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.