ताज्या बातम्या

अभिनंदन देवाभाऊ! 'सामना'तून मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक

नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौऱ्यावर होते.

Published by : Siddhi Naringrekar

नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात फडणवीसांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले तसेच 11 नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘सामना’ मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक करण्यात आलं आहे. याच्याआधी देखील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सामना अग्रलेखात नेमकं काय?

‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा’ आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत!

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा हवाला दिला. मुख्यमंत्री म्हणाले तसे खरेच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच सकारात्मक म्हणावे लागेल. प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य जनता, गरीब आदिवासी यांच्यासाठी तर खरोखरच हा दिवस कलाटणी देणारा ठरेल.

"गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांमुळे आजवर विकासाची साधी तिरीपही येऊ शकली नाही, असा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य आहेच, परंतु राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीही अशा ठिकाणी अनेकदा महत्त्वाची ठरत असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती दाखविण्याचे ठरविले असेल तर आनंदाची गोष्ट आहे. नक्षलवाद हा भारतीय समाजाला लागलेला डाग आहे. माओवादाच्या नावाखाली तरुण पोरे अंगावर सैनिकी पोशाख चढवतात. हाती बंदुका घेतात व जंगलातून प्रस्थापितांविरुद्ध समांतर सशस्त्र सरकार चालवले जाते. शोषण करणाऱ्यांविरुद्ध आणि सावकारीविरुद्ध लढा असल्याचे भासवून नक्षलवादी आर्मीत बेरोजगारांना भरती केले जाते व सरकारविरुद्ध लढवले जाते. हे सर्व चालते ते माओवादाच्या नावाखाली. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील हे चित्र बदलायचे ठरवले असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी ‘मोटरसायकल’वरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले होते. तथापि, त्यांचे हे फेरफटके तेथील आदिवासींच्या विकासापेक्षा ठरावीक खाणसम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते, असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले”

‘संभाव्य पालकमंत्री’ फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काही तरी करतील, तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील, असे एकंदरीत दिसत आहे. फक्त केलेल्या दाव्यानुसार गडचिरोलीच्या विकासाचा वादा पूर्ण करण्यासाठी त्यांना विकासाचा तेथील ‘रोडमॅप’ प्रत्यक्षात आणावा लागेल. गडचिरोलीत असे आतापर्यंत झालेले नाही. नक्षलवाद्यांच्या विरोधाकडे त्यांना बोट दाखवता येणार नाही. नक्षलवाद्यांचा विरोध मोडून काढायचा आणि त्याच वेळी विकासकामांची पूर्तता करायची, या दोन्ही आघाड्या त्यांना कसोशीने सांभाळाव्या लागतील. जहाल महिला नक्षलवादी ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेले समर्पण आणि त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर म्हणजे 77 वर्षांनी प्रथमच धावलेली अहेरी ते गर्देवाडा ही एसटी बस या गोष्टी निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या ‘मिशन गडचिरोली’च्या दृष्टीने बोलक्या आहेत. ‘लॉयड मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि.’ या कंपनीच्या पोलाद कारखान्याचाही शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीत केला. यापुढे गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’चा दर्जा मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अर्थात त्यासाठी त्यांना गडचिरोलीला नक्षलवाद्यांच्या ‘पोलादी’ पंजातून पूर्णपणे मोकळे करावे लागेल. असे सामनाच्या मुखपत्रातून म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय