संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येत असल्याची घोषणा झाली, पण त्यानंतर राजकीय वाद उफाळून आला. जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी जागावाटप ठरवले असले तरी स्थानिक पातळीवर नाराजी उघडपणे समोर आली आहे.
युतीनुसार शिवसेना 25 तर भाजप 27 जागांवर लढणार आहे. मात्र या निर्णयामुळे वैजापूरसह काही भागांत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट मंत्री अतुल सावे यांना जाब विचारत आंदोलन केले आणि काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
कार्यकर्त्यांचा आक्षेप असा की, अनेक जागांवर मेहनत करूनही त्या शिवसेनेला दिल्या गेल्या. त्यामुळे आता विरोधी उमेदवारासाठी काम कसे करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांत युती न करता दोन्ही पक्ष आमनेसामने लढणार आहेत. एकीकडे युती जाहीर झाली असली तरी दुसरीकडे अंतर्गत असंतोषामुळे संभाजीनगरचे राजकारण तापले असल्याचे चित्र दिसत आहे.