आयपीएलच्या शनिवारी झालेल्या सामन्यात समीर रिझवीच्या झंझावाती अर्धशतकासह करुण नायरच्या मोलाच्या खेळीच्या बळावर दिल्ली संघाने पंजाबचा सहा गडी राखून पराभव करत हंगामाचा समारोप विजयाने केला. पहिल्यांदा फलंदाजी करत पंजाबने 20 षटकांत 8 बाद 206 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 19.3 षटकांत 4 बाद 208 धावा करत लक्ष्य पार केले.
दिल्लीकडून केएल राहुल (35) आणि फाफ डुप्लेसिस (23) यांनी 55 धावांची सलामी भागीदारी रचली. त्यानंतर करुण नायर (44) आणि समीर रिझवी यांनी चौथ्या गड्यासाठी 62 धावा जोडत विजयाचा पाया घातला. अखेर रिझवीने ट्रिस्टन स्टब्ससोबत (नाबाद 18) नाबाद 53 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. रिझवीने केवळ 25 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 58 धावा केल्या. पंजाबकडून हरप्रीत बारने दोन, तर मार्को यान्सेन आणि प्रवीण दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पंजाबच्या डावात श्रेयस अय्यरने 34 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याला साथ देताना मार्कस स्टॉयनिसने 16 चेंडूंमध्ये नाबाद 44 धावा (3 चौकार, 4 षटकार), तर जोश इंग्लिसने 12 चेंडूंमध्ये 32 धावा (3 चौकार, 2 षटकार) केल्या. दुसऱ्या गड्यासाठी इंग्लिस आणि प्रभसिमरन सिंग (28) यांनी 47 धावांची भागीदारी केली, तर अय्यरने नेहल वधेरासोबत चौथ्या गड्यासाठी ४१ धावा जोडत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. शेवटच्या षटकांत स्टॉयनिसने झंझावाती फलंदाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा पार करून दिला.
IPL मधील टॉप चार संघ
1. गुजरात टायटन्स – 18 गुण (13 सामने), नेट रन रेट : +0.602
2. पंजाब किंग्स – 17 गुण (13 सामने), नेट रन रेट : +0.327
3. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 17 गुण (13 सामने), नेट रन रेट : +0.255
4. मुंबई इंडियन्स – 16 गुण (13 सामने), नेट रन रेट : +1.292
प्लेऑफ्ससाठी पात्र संघांतील उर्वरित सामने
1. गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स – 25 मे
2. पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स – 26 मे
3. लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 27 मे