मनसेची बैठक रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडली आहे. या बैठकीत मनसेकडून नव्या केंद्रीय समितीची स्थापना आणि मुंबई अध्यक्षांसह 3 उपाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला राज ठाकरेंसह मुंबईतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत गुढीपाडव्याला होणारा मनसेचा मेळावा आणि मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसेच संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता होती.
अशातच आता मनसे मुंबई अध्यक्ष पदावर संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय समिती प्रत्येक गटासाठी नेमली जाणार असून प्रत्येक घटकासोबत केंद्रीय समिती संवाद साधेल. तो प्रश्न पक्ष स्तरावर सोडवला जाईल. तसेच मुंबई अध्यक्ष अंतर्गत ३ उपाध्यक्ष असतील. उपाध्यक्षांअंतर्गत इतर विभाग अध्यक्ष काम करतील. मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे.
अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्ष यांची जबाबदारी असणार आहे. बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांसह विविध नेत्यांकडे केंद्रीय समितीची जबाबदारी असून 20 ते 25 हजार गटाध्यक्षांनी काय करायचं, कामं कशी करायची त्याची आखणी 2 एप्रिल पर्यंत सर्वांना मिळणार आहे. शहर रचनेत कामांची रचना आखणी करण्यात आली आहे. काम काय करायचं आणि काय नाही करायचं, हे सांगितले जाईल. ज्याला जे काम दिलं तेच करायचं आशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.