पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले पंकज देशमुख यांची पदोन्नती होऊन ते आता पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी आता संदीप सिंग गिल्ल यांची बदली करण्यात आली आहे. सध्या पुणे शहर पोलीस दलात सेवा देत असून, एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडे पुणे शहरात कोयता गँगविरोधात राबविण्यात आलेल्या कठोर कारवाईमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्यांनी आक्रमक आणि प्रभावी धोरणांचा अवलंब केला.
पुणे ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्थेचा अंमल सुनिश्चित करणे, तसेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे या त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख जबाबदाऱ्या असतील. ते जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती नवीन रणनीती राबवतात आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम कशी करतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. संदीप सिंग गिल्ल यांच्या नेमणुकीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात नव्या जोमाने कार्य सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांशी पोलीस दलाचे संबंध अधिक सुसंवादात्मक व विश्वासार्ह करण्यावरही त्यांचा भर राहण्याची शक्यता आहे.
संदीप सिंग गिल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदासाठी शिफारस मागील वर्षी सप्टेंबरमध्येच करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन अधीक्षक पंकज देशमुख यांची केवळ सात महिन्यांच्या कार्यकाळातच मुदतपूर्व बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (CAT) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत न्यायाधिकरणाने देशमुख यांच्या बदलीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती.नंतर, देशमुख यांची नियुक्ती पुणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदावर करण्यात आल्यानंतर गिल यांची पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. आता त्यांची अधिकृत नियुक्ती झाल्यानंतर, या पदावर त्यांच्याकडून काय धोरणात्मक बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.