थोडक्यात
फडणवीस फार कंजूस माणूस - राऊत
दसरा मेळाव्यातील ठाकरेंचे भाषण सुपर होतं- राऊत
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विकासावर एकही शब्द न बोलता माझे हजार रूपये वाचवले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काल (दि.3) आभार मानले होते. एवढेच नव्हे तर, ठाकरेंच्या भाषणावेळी समोर माणसंही नव्हती असे विधान करत खिल्ली उडवली होती. ठाकरेंवरील या विधानानंतर आता यावर राऊतांनी (Sanjay Raut) त्यांच्या भात्यातील बाण सोडत फडणवीसांच्या व्यक्तीमत्त्वावरच बोट ठेवत जिव्हारी लागणारी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस फार कंजूस माणूस
फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले की, फार कंजूस माणूस आहे फडणवीस. शेतकऱ्यांना मदत कशाप्रकारे द्यायला हवी मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सर्वांनी कानात बोळी घातली आहेत. गौतम अदानी यांना मुंबई विकत असल्याचे म्हणत कमिशनवरील मुख्यमंत्री असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे.
दसरा मेळाव्यातील ठाकरेंचे भाषण सुपर होतं
दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackray) भाषण सुपर होतं असेही राऊत म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मराठी माणसांसाठी एकत्रित येत आहोत. जरांगेबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे. मात्र, खुळचट बुळचट मुख्यमंत्री असल्याचे राऊत म्हणाले. शिंदे यांचा दसरा मेळावा नव्हता, दसरा मेळावा हा फक्त उद्धव ठाकरे यांचाच असल्याचा दावाही राऊतांनी केला.
पुण्यातलं प्रशासन तिघांनी वाटून घेतलंय
पुण्यातलं प्रशासन हे तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतले आहे. यात फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांचा समावेश आहे. पुणे पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना नेमले आहे ते टोळी प्रमुख यांच्यासाठी काम करत असल्याचेही राऊत म्हणाले. भाजपने पुणे मेट्रोमध्ये १२ हजार कोटी रुपये खाल्ल्याचे गंभीर आरोपही यावेळी राऊतांनी केला. मेट्रोच्या भ्रष्टाचारात भाजपचे आणि दोन शिंदे गटाचे लोक असल्याचे राऊत म्हणाले.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीसांना ठाकरेंच्या दसरा मेळावा आणि त्यांच्या भाषणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीसांनी सर्वात पहिले ठाकरेंचे हजार रूपये वाचवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले. मी पत्रकारांना विचारलं की, मला एक हजाराचा फटका आहे का? असे विचारले. कारण मी आवाहन केले होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा असे आव्हान केले होते. मी, ठाकरेंचे भाषण ऐकले नाही पण ज्यावेळी ज्यावेळी काही जणांकडून माहिती घेतली त्यावेळी अनेकांनी ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा घेतला नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर न बोलल्याने माझे एक हजार रूपये वाचल्याचे फडणवीस म्हणाले.
ठाकरेंच्या भाषणावेळी सभेला पुढे माणसही नव्हती असा टोलाही फडणवीसांनी लगावला. त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, पालिकेला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करुन दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवल्याचे फडणवीस म्हणाले.