ताज्या बातम्या

संजय राऊत यांनी अजितदादांना डिवचलं; म्हणाले, पदमुक्त व्हा

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पक्षात पडले. मात्र पक्षफुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटींमुळे सर्वांमध्येच संभ्रमाचं वातावरण आहे

Published by : shweta walge

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यांनंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. यावरुनच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मधून अजितदादांवर जोरदार टीका केली आहे. त्या संस्थांमधून अजितदादा यांनी पदमुक्त व्हावे, असं म्हणत संजय राऊत यांनी अजितदादांना डिवचले आहे.

सामना रोखठोक जसंच्या तसं

अजित पवार, शिंदेंचे काय होणार? महाराष्ट्राचे गोलमाल राजकारण

शरद पवार आणि अजित पवार भेटले. हे विषय आता मागे टाकायला हवेत. दोन पवारांतली भेट ही राजकीय नसावी. श्री. पवार यांनी राज्यात अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रात त्या काम करतात. त्या संस्थांवर शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना बसवले. आता पुढे काय, हा प्रश्न आहे. पवारांच्या हयातीत अजित पवारांनी त्यांच्या पक्षावरच दावा सांगितला, तेथे संस्थांचे काय ?

शरद पवार यांच्या राजकारणावर महाराष्ट्र गेली 45 वर्षे चर्चा करतो आहे. पवार यांच्या संसदीय राजकारणास पन्नास वर्षांचा कालखंड होऊन गेला. इतका प्रदीर्घ काळ चर्चेत व राजकारणात असलेला दुसरा नेता आज तरी देशाच्या राजकारणात नाही. आता श्री. पवार पुनः पुन्हा चर्चेत येत आहेत ते अजित पवार यांच्याशी सुरू असलेल्या बैठकांमुळे. अजित पवार यांनी पवारांशी राजकीय नाते तोडले. अजित पवार व त्यांचा गट भाजपच्या गोटात शिरला व त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर सुरू असलेल्या 'ईडी' कारवायांना ब्रेक लागला. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटण्याचे हे मुख्य कारण आहे. अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल. अजित पवार यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. आजच्या शिखरावर नेऊन बसवले. त्या शिखरावरून त्यांनी शरद पवार यांनाच ढकलण्याचा प्रयत्न केला. तरीही शरद पवार-अजित पवार यांच्यात 'संवाद' होतो. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होणारच. शरद पवार व अजित पवार का भेटत आहेत? माझ्या माहितीनुसार या बैठका राजकीय नाहीत; तर श्री. शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती, सहकारासंदर्भात ज्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले त्या सर्व संस्थांवर अजित पवार यांना पवारांनी आणले. हजारो शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे भविष्य या संस्थांत आहे. संस्थांचे भवितव्य काय हे ठरवण्यासाठी या बैठका असाव्यात. महाराष्ट्राच्या सगळ्य़ात मोठय़ा रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री. शरद पवार, तर संचालक म्हणून अजित पवार आहेत. असे त्रांगडे अनेक संस्थांत आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचे काम श्री. शरद पवार यांनी केले. त्या वेलूवर आज जे लटकत उभे आहेत त्यांनी त्यांची पदे सोडून स्वतःच्या नव्या संस्था निर्माण करण्याचे राजकीय औदार्य दाखवायला हवे. पण शेवटी हा पवारांच्या कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे. जेथे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच अजित पवार दावा सांगत आहेत व श्री. पवारांच्या हयातीत त्यांच्या पक्षावर स्वामित्व सांगितले गेले, तेथे संस्थांच्या हक्कांवर काय बोलायचे?

मार्मिक चित्र

पवारांच्या राजकारणाचे आकलन भल्याभल्यांना होत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी पवारांवर उत्तम व्यंगचित्र काढले. एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांना विविध पक्ष्यांच्या रूपात त्यांनी चितारले. पवार यांना खुर्चीला भोके पाडणाऱया सुतार पक्ष्याची उपमा दिली. शरद पवार 'सुतार पक्षी' चोच टोकदार नसताना खुर्चीला भोके पाडतो' असे त्यांनी चित्रात दाखवले. पवारांच्या राजकारणावरचे हे मार्मिक भाष्य होते. तब्बल 40-45 वर्षांनंतर अजित पवार हे सुतार पक्ष्याच्या रूपात दिसत आहेत व पवारांच्या पक्षाला भोके पाडून ते निघून गेले. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा वापर करून शरद पवार यांचे महाराष्ट्रातील नेतृत्वाचे युग संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महाराष्ट्राचे एक बलदंड नेते म्हणून श्री. पवार यांचे जे स्थान आहे त्यास यामुळे धक्का बसला. नियती रोज नवे डाव खेळत असते व राजकारणाचे हे चक्र खाली-वर होत असते. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे वर्चस्व राहू नये यासाठी शिवसेना व शरद पवार यांना संपवायला हवे हे आजवर दिल्लीचे कारस्थान राहिले आहे. पण श्री. उद्धव ठाकरे हे नव्या उमेदीने उभेच आहेत व शरद पवार या वयातही महाराष्ट्रात रान पेटवण्याच्या जिद्दीने फिरत आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबाबतीत जे दिल्लीचे राजकारण झाले ते महाराष्ट्राला रुचलेले नाही व लोकांनी या दोन नेत्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना नव्या वादळासमोर उभे राहणे सोपे नाही.

पक्षाचे मालक कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार हे चित्र चुकीचे आहे. जसे एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना असे होऊ शकत नाही, तसे अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ शकत नाही. अर्थात उद्धव ठाकरे यांनी शिंदे व त्यांच्या गटाविरुद्ध ठाम भूमिका घेतली. न्यायालयीन लढाई, विधानसभा अध्यक्षांसमोरचा संघर्ष अशा प्रत्येक ठिकाणी शिवसेना लढते आहे. आरपारची लढाई करण्यासाठी शिवसेना उतरली आहे. फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याचे शिवसेनेचे 'लक्ष्य' आहे. राष्ट्रवादीत कोण कोणाबरोबर व आकडा किती हे आजही कोणाला कळलेले नाही. जयंत पाटील हे ठामपणे शरद पवार यांच्या पाठीशी आहेत, पण जयंत पाटीलही भाजपच्या दिशेने निघाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पाटील यांच्या कुटुंबीयांना 'ईडी'ने छळले आहे व त्यांची कोंडी केली आहे. 'कोणी कोणत्या पक्षात जायचे हा निर्णयही 'ईडी' घेते,' असे यावर श्री. शरद पवार यांचे विधान आहे. 'ईडी'च्या भयाने आज जे पळाले ते 2024 च्या सत्ताबदलानंतर परत फिरतील असे वाटते. मोदींचे सरकार जात आहे याची झुळूक जरी लागली तरी भाजपचा तंबू रिकामा होईल. अजित पवार यांच्याशी भेटीगाठी झाल्या तरी भाजप व मोदींबद्दल ठाम भूमिका पवारांनी घेतली हे दिसते आहे व त्याची कारणेही स्पष्ट आहेत. मोदींचे समर्थन म्हणजे प्रतिगामी शक्तीचे समर्थन व जे आज गेले आहेत त्यांचे राजकारण पुढे आपोआपच संपेल हा त्यांचा विश्वास आहे. अजित पवारांबरोबर भाजपच्या कळपात शिरण्याची चूक शरद पवार करणार नाहीत. शेवटी हा व्यक्तीचा विषय नाही. लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीचा विषय आहे. भारतीय जनता सरंजामशाहीची भोक्ती नाही. काँग्रेसच्या सरंजामशाहीला कंटाळून लोकांनी मोदींना सत्तेवर आणले. मात्र मोदी राजवट ही हुकूमशाहीच्याही वरचढ निघाली. लोक आता या सत्तेलाही कंटाळले आहेत. सर्व सरंजामशाह्या मोडून नवा भारत निर्माण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना गोलगोल गोलमाल राजकारण करता येणार नाही. अजित पवार हे काकांच्या जिवावर मोठे झाले व काकांचे राजकारण त्यांनी संकटात आणले व आज गोलमाल राजकारण करीत आहेत.

महाराष्ट्राचे बुरुज

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला अजित पवार हा सुतार पक्षी भोके पाडेल व या सुतार पक्ष्याला बळ द्यायचे काम देवेंद्र फडणवीस करतील हे आता नक्की झाले. शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचेच आहे व फडणवीस यांना मानणाऱ्या भाजप आमदारांना शिंदे यांचे ओझे झाले आहे. शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे अतोनात नुकसान सुरू आहे, असे सांगणारी शिष्टमंडळे दिल्लीत अमित शहांना भेटतात व महाराष्ट्रात बदल होतील, असे त्या शिष्टमंडळांना सांगण्यात येते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी 2024 नंतरही आपणच असणार असे श्री. अमित शहांचे वचन असल्याचे शिंदे सांगतात. ते आता खरे नाही. वचन पाळायचे होते. तर अजित पवारांचा घोडा रिंगणात आलाच नसता. महाराष्ट्रातले राजकारण हेलकावे खात आहे व त्या अस्थिरतेचा फायदा दिल्लीला घ्यायचा आहे.

शरद पवार अजित पवार भेटीचा विषय मागे पडला आहे. तो मागे पडणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे. अजित पवार यांना स्वबळावर स्वतःचे मोठेपण सिद्ध करायचे आहे, तरच ते नेते ठरतील. त्यांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणुका लढवाव्यात. भाजपच्या मदतीने जे शिंद्यांनी केले तेच अजित पवार करत असतील तर त्यांचे राजकारण वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळेल. कारण राजकारणात बुरुजांना महत्त्व आहे. वाळूच्या किल्ल्यांना नाही.

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या तसेच चालले आहे.

दरम्यान, पक्षफुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटींमुळे सर्वांमध्येच संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना त्यांच्यातील गुप्त भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे. या भेटीचे अनेक तर्क लावले जात आहे. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख