काल म्हणजेच 10 मे 2025 ला भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली होती. यामुळे दोन्ही देशातील युद्धाला पुर्णविराम लागल्याची माहिती ट्रम्प यांनी स्वत: दिली होती. यादरम्यान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी जाहीर केले की, दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर काही कालावधीत जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुन्हा ड्रोन दिल्याचे आणि ड्रोनच्या हल्ल्याचे आवाज ऐकू आले. यानंतर संपुर्ण देशात पुन्हा खळबळ माजली. याचपार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करणारे डोनाल्ड ट्रम्प कोण? असा प्रश्न उपस्थित करत शस्त्रसंधीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले म्हणून हिंदुस्थानी सैन्याचे मनोबल प्रचंड उंचावलेले असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने सैन्याचे आणि देशाचे मनोबल खचवले. पहलगामच्या हल्ल्यामध्ये आमची माणसं मेली आमच्या 26 बहिणींचे कुंकू पुसले गेले. ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करणारे ट्रम्प कोण आहेत".
"युक्रेन-रशिया युद्धावेळी भाजपने सांगितलं होत की, 'पापा ने वॉर रुकवा दी...' मग भारत आणि पाकिस्तानचं युद्ध अमेरिकेच्या पापाने युद्ध थांबवले का? कोणत्या अटी-शर्तीवरक युद्धबंदी केली यासाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी. पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवण्याची संधी असताना युद्धबंदीची, माघार घ्यायची गरज काय?"
"खरं तर हा पाकिस्तानविरुद्ध लढणाऱ्या देशाच्या शूर सैन्यांचा आणि पहलगाम हल्ल्यामध्ये कुंकू पुसले गेलेल्या भगिनींच्या त्यागाचा अपमान आहे. यावेळी माघार घ्यायची गरज नव्हती, असं म्हणत संजय राऊत यांनी काल झालेल्या हल्ल्यावरुन, शस्त्रसंधीवरुन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत".