महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मुंबईच्या महापौरपदावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईचा पुढील महापौर नेमका कोण असणार आणि तो कोणत्या पक्षाचा असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीतील भाजप तसेच शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांकडून महापौरपदावर दावा केला जात असताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना थेट एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. “एकनाथ शिंदे यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी टीकेची धार वाढवली. महापौरपद महायुतीच्याच वाट्याला जाणार असेल, तर मग सौदेबाजी कशासाठी सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “भ्रष्ट पैशांच्या जोरावर बिनविरोध निवडणुका घेण्यामागे नेमकं काय कारण आहे?” असा थेट प्रश्न राऊतांनी विचारला.
महापौरपदाच्या अधिकारांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, भारतातील महापौरपद हे केवळ शोभेचे आहे. परदेशातील महापौरांकडे मोठे प्रशासकीय अधिकार असतात, मात्र आपल्या देशात तसे अधिकार नाहीत. “खरा पैसा आणि सत्ता स्थायी समितीकडे आहे. म्हणूनच सर्वांचा डोळा स्थायी समितीवर आहे. तिथेच आर्थिक व्यवहार होतात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. सध्याची सारी धडपड ही ब्लॅकमेलिंगद्वारे नगरसेवक फोडण्याची असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
केडीएमसीतील परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले की, “आमचे दोन नगरसेवक सध्या दिसत नाहीत, हे खरे आहे. मात्र याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असून आम्ही घाबरलेलो नाही.” पुढे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केला की, “शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या 40 आमदारांचे त्यांनी काय केले?” विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यानंतरच असे पक्षांतर घडते, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपावर आणखी गंभीर आरोप करत संजय राऊत म्हणाले की, भाजपाने स्वतःच्या नगरसेवकांवरच ‘वॉच’ ठेवला आहे. “त्या-त्या भागातील लोकांना सांगण्यात आले आहे की, संबंधित नगरसेवकांवर लक्ष ठेवा. त्यामुळे ते सध्या घराबाहेरही पडत नाहीत. ते कुठे जात आहेत, कोणाशी बोलत आहेत, यावर नजर ठेवली जात आहे. इतकेच नव्हे, तर नगरसेवकांचे फोनही टॅप केले जात आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “रश्मी शुक्ला असोत वा नसोत, प्रक्रिया तीच आहे. ताज लँडसारख्या प्रकरणांमध्ये जे अडकले आहेत, त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांवर नजर ठेवत आहे,” असा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या हस्तक्षेपावर भाष्य करताना संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी कालच सांगितलं होतं, सगळ्या चाब्या दिल्लीतून हलवल्या जात आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार, हे मुंबईत नाही तर दिल्लीत ठरवलं जाईल,” असे म्हणत त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे महापौरपदाची निवड केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, थेट राष्ट्रीय पातळीवरील सत्तासंघर्षाचे प्रतिबिंब असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आता या आरोपांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) काय भूमिका घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.