जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संसदेत तीव्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राजीनाम्याची मागणी केली आहे.
"देशाच्या सुरक्षेची घोर चूक झाली आहे. या चुकांची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा," अशी थेट मागणी राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित राहून केली. या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
राऊत म्हणाले की, "पहलगाम हल्ल्यात 26 जण मारले गेले. जर पंतप्रधान म्हणतात की, मी वेळेआधी वेळ ओळखतो, तर मग हे दहशतवादी पहलगाममध्ये येणार आहेत, हे त्यांनी का ओळखलं नाही?, ही सुरक्षा यंत्रणांची चूक नसून सरकारचे अपयश आहे," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान स्वतःला ईश्वराचा अवतार मानतात, त्यांचे भक्तही त्यांना तसंच समजतात. ते म्हणतात ईश्वराची कृपा आहे, त्यामुळे वेळेआधी वेळ कळते. मग या हल्ल्याची चाहूल का लागली नाही?," असा कडवट सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
'पंडित नेहरूंची कृपा आहे, म्हणून तुम्ही सत्तेत आहात'
पंतप्रधान मोदींना उद्देशून राऊत म्हणाले की, "आज तुम्ही ज्या खुर्चीत बसला आहात, ती पंडित नेहरूंच्या लोकशाही विचारसरणीमुळे मिळालेली आहे. त्यांच्या संविधानिक दृष्टिकोनामुळे आज तुम्ही राजकारणात आहात. नेहरूंनी घातलेल्या लोकशाही पायाभरणीमुळेच तुम्ही पंतप्रधान आहात, त्यामुळे त्यांचे आभार मानायला हवेत."
संजय राऊत यांनी पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धविरामावरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "पाकिस्तान आपल्या समोर हात जोडून युद्धविरामाची विनंती करत होता. सरकारने युद्धविराम स्वीकारला, पण त्यानंतर भारताला नेमकं काय मिळालं?, अशा परिस्थितीतही पाकिस्तानचा विश्वास ठेवावा का?"
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी दर्शवली आहे.
हेही वाचा