सामनातून अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा खडूस असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, अर्थमंत्री हा खडूसच असायला पाहिजे. आता खडूस नाही आहेत का त्या? त्या कशाप्रकारे बोलतात. अग्रलेखामध्ये त्या बाईंना खडूस म्हटले त्यामध्ये तुम्ही संपूर्ण अग्रलेख वाचा. अर्थमंत्रीपदावरील व्यक्ती खडूसच असते, कठोर असते आणि दयाबुद्धीने काम न करणारी असते.
तिला फक्त देशाच्या तिजोरीमध्ये महसूल मिळवायचा असतो. त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा, कोणाची पाकीटं मारायची यासाठी अर्थमंत्र्याची नेमणूक असते. प्रधानमंत्र्यांना ज्या गोष्टींचा वाईटपणा घ्यायचा नसतो ते अर्थमंत्र्याच्या माध्यमातून घेत असतात. त्यामुळे हा फार मोठा विषय नाही आहे.
आपल्या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी काही योजना आहेत का? महागाई वाढली, बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपायोजना आहेत का? महागाई, बेरोजगारी कमी होणार नसेल, तर मध्यमवर्गीयाच भलं कसं काय होणार? रुपया ज्या पद्धतीने कोसळला आहे. डॉलरच्या तुलनेत 87 पर्यंत कोसळला आहे. रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का? मी म्हणतो अजिबात नाही. 12 लाखापर्यंत इनकम टॅक्स स्लॅब आहे, त्या पलीकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरीबांसाठी कोणती योजना मला दिसत नाही. असे संजय राऊत म्हणाले.