पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 50रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८०३ वरून ८५३ झाली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही अनुदानित सिलेंडरची किंमत 500 वरून 550 करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "50 रुपयांची गॅसच्या किमती वाढल्या. जागतिक बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत. जागतिक बाजारामध्ये जर कच्चा तेल्याचा किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलिंडरच्या किमती का वाढाव्यात? ही कसली वसुली चालू आहे. ही कसली पाकिटमारी चालू आहे."
"एका बाजूला जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे. त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सितारामन या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचे काम करत आहेत. 50 रुपये सिलिंडरची वाढ झाली. लाडक्या बहिणींचे बजेट परत कोलमडलं. माझं आव्हान आहे स्मृती इराणी, कंगना राणावत यांना ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी आमचं नेतृत्व करावं त्यांनी महिलांचे. हा राजकीय प्रश्न नसून या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. जागतिक बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे 50 रुपयांवरती स्थिर असायला पाहिजे आणि सिलिंडरच्या किमतीसुद्धा किमान 400 रुपयांनी खाली यायला हव्या. या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची, गृहीणींची लूट सुरु आहे. निवडणुका आल्या की लाडक्या बहिणींसारखी योजना आणायची, 4 महिने राबवायची आणि मग लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडायचं." असे संजय राऊत म्हणाले.