केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, 'केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाला आणि गृहमंत्री कोण? तर स्वत: आमचे देवेंद्रजी फडणवीस. राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खात्याकडे पाहायला. आता विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता कोण? सगळे सामाजिक कार्यकर्ता आहेत ना. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे हे सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मोठं सामाजिक कार्य या राज्यात केलं आहे. या महाराष्ट्रात तुम्ही सत्तेच्या बळावर काय पेरत आहात?'
'काल आम्ही ठाण्यामध्ये गेलो आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न गुंडांनी केला. आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्या ठिकाणी चांगला बंदोबस्त ठेवला. त्यानंतर आम्ही माननीय दिघे साहेबांना पुष्पहार, शाल अर्पण केली. आमची पाठ वळताच एक गुंड आला त्याने तो हार काढला आणि रस्त्यावर फेकला. हा दिघेसाहेबांचा अपमान नाही का? या महाराष्ट्रामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी.'
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातल्या लेकी बाळींची काय परिस्थिती आहे. बीडमध्ये काय चाललयं? मुंडेंची पत्नी व मुलगी परत उपोषणाला बसले आहेत. ती तुमची लाडकी बहीण नाही?' असे संजय राऊत म्हणाले.