Sanjay Raut On Gautam Adani Baramati Visit Rohit Pawar : गौतम अदानी यांच्या बारामती दौऱ्यावर मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमात रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी चालवली, तर अजित पवार त्यांच्या सोबत बसले होते. या वेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अदानींविरोधात मोठी टीका केली आहे.
गौतम अदानी यांचा बारामती दौरा महत्त्वाच्या कार्यक्रमाचा भाग होता. त्यांच्या हस्ते "शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स" (AI) या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार कुटुंब एकत्र आले होते आणि याचा राजकारणात मोठा अर्थ काढला जात आहे. अदानींच्या आगमनावर मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. खासदार संजय राऊत यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
“तो त्यांचा व्यक्तिगत मुद्दा”
संजय राऊत यांनी मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधताना, पवार आणि अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत, तर ते कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत, असे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, "ज्याला जो कार्यक्रम करायचा असतो, त्याला कोणाला आमंत्रण द्यायचं हे त्याचे वैयक्तिक हक्क असतात. पवारांचे कुटुंब एकत्र असणे, ज्यामध्ये अजित पवार देखील आहेत, तो त्यांचा खास प्रश्न आहे." राऊत यांनी स्पष्ट केले की, याला राजकारणाशी जोडून पाहण्याची गरज नाही.
“मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी घातक”
संजय राऊत यांची टीका यावर थांबली नाही. त्यांनी अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, "आमचा विरोध याच कारणावर आहे की, मुंबईवर ज्या पद्धतीने एक उद्योगपती आपला ताबा मिळवतो, तो भाजपचा मित्र आणि मोदींचा सहयोगी आहे. या पद्धतीने मुंबईला गिळण्याचा प्रयत्न होत आहे आणि हे मराठी लोकांसाठी आणि मुंबईसाठी अत्यंत धोकादायक आहे."
"अदानी आणि पवारांचे संबंध खरे-खोटे तेच सांगतील"
राऊत यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांवर भाष्य करत म्हटले की, "त्यांचे संबंध राजकीय नसून, व्यक्तिगत आणि कौटुंबिक आहेत. अदानींना पवार कुटुंबाने आमंत्रित केले असेल, तर त्यात काहीही गैर नाही." यावरून राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्ष फोडण्यास अदानींचा कोणताही सहभाग होता का, याबद्दल एक सूचक विधान केले. "पवारांचे पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी चर्चा होती. आता तेच सांगतील, खरे आणि खोटे," असे संजय राऊत यांनी शेवटी सांगितले.
थोडक्यात
गौतम अदानी यांच्या बारामती दौऱ्यावर राजकीय चर्चांना उधाण.
रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी चालवली.
अजित पवार गाडीमध्ये त्यांच्या सोबत बसले होते.
संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गौतम अदानींविरोधात मोठी टीका केली आहे.