लोकसभेत मंजूर झालेले वक्फ सुधारणा विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आले. यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तरं देत सळो की पळो करून सोडले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वक्फ विधेयक मंजूर करणे म्हणजे भारताला हिंदू पाकिस्तानी राष्ट्र बनवण्याचा सरकारचा डाव असल्याची खरमरीत टीका त्यांनी आपल्या भाषणात केली. संजय राऊत यांनी राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित, तुम्ही मला शिकवू नका, मी खूप शिकून आलो आहे. माझा जन्मच हिंदुत्वासाठी झाला आहे, असे म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले की, "तुम्ही खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?. सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत. मला वाटायचं आम्ही हिंदुराष्ट्र बनवणार आहोत, पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरू आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतात, आता मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात."