शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नवीन समीकरणांच्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा असताना राज ठाकरे काल अचानक वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही भविष्यात दोन्ही पवार गट एकत्र येण्याची शक्यता असू शकते असे संकेत दिले. या सर्व घडामोडींवर भाष्य करताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, आधी त्यांनी आमचा बाप (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) पळवला. आता ते भाजपचा बाप पळवत आहे, अशी टीका त्यांनी केली. तर शरद पवारांच्या वक्तव्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले.