अहमदाबादमधील एअर इंडिया ड्रीमलायनर विमान दुर्घटनेनंतर आता ही घटना अपघात नव्हे, तर घातपात होता का, यावर राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात मोठा गौप्यस्फोट करत सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, "दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद पडणं हे केवळ तांत्रिक बिघाड नसून यामागे सायबर हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे."
राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढताना म्हटले की, "घटनेनंतर केंद्र सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश दिसला नाही. पाहणी करताना एकाच्याही डोळ्यात पाणी नव्हतं. ही सरकारी संवेदनशून्यता धक्कादायक आहे." त्यांनी सरकारला थेट सवाल करत विचारले की, "विमानतळांवर एटीसीमध्ये 56 टक्के मनुष्यबळ कमी आहे. तांत्रिक कर्मचारी अपुरे आहेत. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत."
"सरकारला यातून धडा घ्यायला हवा. एअर इंडियाला खासगी संस्थेकडे सोपवून जबाबदारी झटकता येणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. राऊत यांच्या या विधानामुळे विमान अपघाताच्या चौकशीस नव्या दिशेने चालना मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय पथके सध्या तपास करत असून, ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच खरी कारणमीमांसा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा