आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी गोळा केलेला निधीच्या घोटाळ्याचा मुद्दा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी बाहेर काढला आहे. आयएनएस विक्रांत भंगारात विकण्याची तयारी भाजपाने केली असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीच्या घोटाळ्या संदर्भात त्यांनी भाजपाचे किरीटी सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे जमा झालेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.गोळा केलेला निधी निवडणुकीसाठी वापरला आहे असा गंभीर आरोप देखील संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर (Kirit Somaya) केले आहे.
यावेळी ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणा पारदर्शक किंवा निष्पक्ष असतील तर त्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी हिम्मत दाखवावी. भाजपचे पदाधिकारी असलेले ईडी यांनी ही चौकशी करावी. या भ्रष्टाचाराचे आणि कटाचे सूत्रधार सोमय्याच आहेत. भाजपला यासंदर्भातील घोटाळ्याचं उत्तर द्यावं लागेल. हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा असून राष्ट्रीय भावनेशी खेळ आहे. या सरकारला राष्ट्रीय भावना नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली 'सेव्ह विक्रांत' या उपक्रमातंर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारातंर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले.