शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आलेले डबल महाराष्ट्र केसरी आणि कुस्तीपटू चंद्रहार पाटील लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत म्हटले की, "हिम्मत असेल तर चंद्रहार पाटील यांचा प्रवेश रोखून दाखवा!"
संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "चंद्रहार पाटील हे येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणीही राहायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे." यासोबतच त्यांनी हेही सूचित केलं की, "जून अखेरपर्यंत आणखी अनेक नेते शिंदे गटात सामील होणार आहेत."
चंद्रहार पाटील यांना सांगलीतून महाविकास आघाडीच्या अंतर्गत उद्धव ठाकरे गटाने थेट उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ही घोषणा काँग्रेस आणि मित्रपक्षांशी चर्चा न करता केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. परिणामी, काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यामुळे चंद्रहार पाटील नाराज झाले होते, ही बाब सर्वश्रुत होती.
या नाराजीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजी चंद्रहार पाटील यांनी कुडाळ येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांनी उदय सामंत यांची स्वतंत्र भेट घेतल्याचीही माहिती आहे. सुरुवातीला त्यांनी फक्त कामानिमित्त भेट" असल्याचे म्हटले होते, पण आता त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राजकीय वर्तुळात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत असून, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. संजय शिरसाट यांच्या आव्हानामुळे पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.