संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. एकाप्रकारे तोच या हत्येत मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. यावरच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
मी सांगत होतो खंडणी आणि खूणातील आरोपी एकच आहेत. जे तपासात सिद्ध झालं आहे जी माहिती समोर आली आहे तीच खरी आहे. जे PCR झाले MCR झाले त्यातून ही माहिती समोर आली आहे. हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत.
CID च्या आरोपपत्रात काय-काय म्हटलय?
या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.