बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे ग्रामस्थ लढा देत आहेत. कालपासून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमूख आणि मस्साजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले आहे की, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.