बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. कालपासून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले की, मला आज ही बातमी कळली. माझ्या नियुक्तीकरता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसांपासून सतत मागणी करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचे उपोषण सुरु केलेलं आहे. हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो.
मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की, सदरचा खटला चालविण्यासाठी मी तयार आहे. त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलं आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या आभारी आहे. मी मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेन की, आपण उपोषण सोडावं. या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत. त्यामुळे आपण असलं कुठेलही कृत्य करु नये जेणेकरुन आपल्या तब्येतीला त्रास होईल.या खटल्यातील तपासयंत्रणा ज्यावेळेला आरोपपत्र दाखल करतील त्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालविण्यास घेऊ एवढे मात्र मी आपल्याला आश्वासित करतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला कल्पना होती. मी राजकारणात कधीही यापूर्वी अॅक्टिव्ह नव्हतो. मी अभिमानाने सांगेन राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही. विरोधकांच्या म्हणण्याला मी महत्व देत नाही. कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्वभाव सध्या आहे. असे उज्ज्वल निकम म्हणाले.