उद्योजक संतोष लड्डांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत पोहोचले आहेत. दरोड्यातील 20 तोळे सोने नांदेडच्या सराफा बाजारात विकल्याचे समोर आले असून, याप्रकरणी एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. यासह आरोपीच्या घरातून गावठी कट्टादेखील पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास परराज्यातही विस्तारला आहे.
दरोड्यातील सोन्याचा मागोवा नांदेडपर्यंत
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या आरोपी योगेश हजबेच्या घरातून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. दरोड्यादरम्यान केअरटेकर झळके यांना बंदुकीचा धाक दाखवण्यात आला होता. त्यामुळे या कट्ट्याचा शोध पोलिस घेत होते. यापूर्वी अमोल खोतकरकडील कट्टा एन्काउंटरच्या दिवशीच जप्त करण्यात आला होता. तसेच सध्या दोन्ही कट्टे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
सोन्याची विक्री आणि रोकड व्यवहार
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथील आरोपी गंगणे याने अमोल खोतकरकडे दिलेले 20 तोळे सोने नांदेडच्या त्याच्या मावस भावाकडे विक्रीसाठी पाठवले. या भावाने ते सोने एका मोठ्या सराफाला विकले आणि त्यामधून तब्बल 19 लाख रुपये रोख रक्कम घेतली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांचे पथक अंबाजोगाईपासून नांदेडपर्यंत तुफान गस्त घालत आहे.
परराज्यातही तपासाचे सूत्र
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, दरोडेखोरांनी लुटलेले सोने वेगवेगळ्या ठिकाणी वाटून टाकले आहे. त्यापैकी काही सोने परराज्यात गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास आता इतर राज्यांमध्येही पसरला आहे.
सोन्याच्या पावत्यांची खातरजमा
दरोड्यानंतर तब्बल १९ दिवसांनी उद्योजक संतोष लड्डा यांनी साडेपाच किलो सोन्याच्या पावत्या पोलिसांना सादर केल्या आहेत. मात्र, दरोड्यातील लुट मोठ्या प्रमाणावर असल्याने अधिकृत रक्कम व सोन्याच्या वजनाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे या पावत्यांचे बारकाईने व्हेरिफिकेशन केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.