म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचा एक अतिशय थक्क करणारा भ्रष्टाचार समोर आला आहे. १० वर्षे निविदा काढून ३८ कोटी रुपयांवर डल्ला घातल्याचं समोर आलं आहे. विक्रोळी पश्चिमेतील सूर्यनगरात एकच सुरक्षा भिंत बांधण्यासाठी १० वर्षे निविदा काढण्यात आल्या आहेत. तर अंधेरीच्या महाकाली गुफा परिसरातही घोटाळा उघड झाला आहे. बांधकाम झाल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात भिंतच बांधलेली नाही.
अंधेरीमधील घोटाळा उघडकीस
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या आखात्यरित्या येणाऱ्या मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये गौड बंगाल केला असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे. अंधेरी पूर्व भागात महाकाली गुफा परिसरामध्ये अनेक ठिकाणी भिंतीच काम केलं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र ज्या ठिकाणी बांधकाम केलं असल्याचं सांगितलं त्याठिकाणी भिंतच नसल्याचं समोर आलं आहे. राजेश्वरी निवास सत्य साईबाबा मंदिर जवळ संरक्षक भिंत बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं होतं. मात्र त्याठिकाणी भिंतीचं बांधकाम केलं नसून फक्त डागडुजी केलं असल्याचं दिसलं. या परिसरात नव्यानं कोणतीही संरक्षक भिंत बांधली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
विक्रोळीतील घोटाळा उघडकीस
विक्रोळी पश्चिममधील सूर्या नगरच्या डोंगराजवळही अशीच भिंत पाहायला मिळते. तिची उंची जवळपास 6 फूट आणि लांबी पाहायला गेले. तर एक किलोमीटरच्या आसपास असेल. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळानं गेल्या दहा वर्षांमध्ये दरवर्षी नव्या-नव्या निविदा काढून ही एकच भिंत दहा वेळा बांधल्याचा आरोप होत आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या भिंतीच्या बांधकामावर जवळपास 38 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळत आहे. तसंच ही भिंत प्रत्यक्षात एकदाच तर कागदावर दहा वेळा बांधून अधिकारी आणि ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचाही आरोप होत आहे.
कोणी मारला डल्ला?
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात जिथे झोपड्यांवर दरड कोसळल्याची भीती आहे किंवा काही कारणास्तव पावसाळ्यात त्या झोपड्यां शेजारी असलेल्या संरक्षक भिंती बांधण्याचा काम केलं जातं यासाठी निधी दिला जातो. मात्र त्याच निधीवर डल्ला मारण्याचे काम करण्यात आला आहे त्यामुळे हा डल्ला नेमका कोणी मारला गरिबांसाठी वितरित केलेला निधी कोणी पळवला हा मोठा प्रश्न आहे.