थोडक्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अजित पवार हे फक्त नाव घेतात
बारामती निवडणुकीत अजित पवारांनी घोटाळे केले आहेत
देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या चर्चेत सहभागी झाले पाहिजे
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे फक्त नाव घेतात. ते बाबासाहेबांना मानत नाहीत. त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी घोटाळेच केलेले आहेत. त्यांची चर्चा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत होऊ शकते, त्यामुळे ते निवडणूक आयोगाकडे कसे येणार, असा सवाल शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. या निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष आणि संविधानाचे पालन करुन व्हाव्यात यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी पत्रकारांना उलट सवाल करत म्हटले की, मी जाईन असं तुम्हाला वाटतं का? यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार यांच्यावर निवडणुकीत घोटाळे केल्याचा गंभीर आरोप केला.
बारामती निवडणुकीत घोटाळे केले
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, बारामती निवडणुकीत अजित पवारांनी घोटाळे केले आहेत. त्यांनी पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले आहेत. रात्रभर बँका उघड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे तिथे त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वाटू शकतं की मी कसा जाईन, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
मतदार वाढवणे आणि वगळणे हा प्रकारही संशयास्पद आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात 60 लाख मतदार कसे वाढले, हा महत्त्वाचा मुद्दा राहाणार आहे, या वेळी याचीही चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या चर्चेत सहभागी झाले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. महापालिका प्रभाग आणि वॉर्ड रचना याबद्दल सर्व पक्षाच्या नेत्यांचे आक्षेप आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत जर हे सर्व पक्ष सहभागी झाले तर संविधान आणि लोकशाही अधिक बळकट होईल. मात्र अजित पवार हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात. बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी ते काही करत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.