भारतीय शेअर बाजारात गैरव्यवहार करणाऱ्या जेन स्ट्रीट ग्रुपवर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठोठावत 4,843.57 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. निर्देशांक ऑप्शन्समध्ये (Index Options) गैरप्रकार करून हा ग्रुप अवैध मार्गाने प्रचंड नफा मिळवत होता, असे SEBI च्या चौकशीतून समोर आले आहे.
SEBI ने जारी केलेल्या अंतरिम आदेशात जेन स्ट्रीट ग्रुपच्या चार कंपन्यांवर ही कारवाई केली आहे. यामध्ये जेएसआय इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेएसआय 2 इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेन स्ट्रीट सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड आणि जेन स्ट्रीट एशिया ट्रेडिंग लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
एप्रिल 2024 मध्ये काही मीडिया अहवालांतून जेन स्ट्रीट ग्रुपच्या भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर SEBI ने सखोल चौकशी सुरू केली आणि अनेक बाजार समाप्तीच्या (expiry) दिवशी BANKNIFTY आणि NIFTY निर्देशांकावर हेतुपुरस्सर आणि समन्वित स्वरूपात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.
उदाहरणादाखल, 17 जानेवारी 2024 रोजी, जेन स्ट्रीट ग्रुपने व्यापाराच्या पहिल्या सत्रात बँक निफ्टीमधील शेअर्स आणि फ्युचर्समध्ये तब्बल 4,370 कोटी रुपयांची खरेदी केली आणि नंतर तीच पोझिशन विक्री करून निर्देशांकात घसरण केली. यामुळे त्यांनी आधी घेतलेल्या पुट ऑप्शन्सवर प्रचंड नफा कमावला आणि बाजारात खोटा तेजीचा संदेश दिला.
त्याच दिवशी त्यांनी एकूण 32,115 कोटींची मोठी मंदीची पोझिशन घेतली होती आणि शेवटी एकूण 46,620 कोटी रुपयांची शॉर्ट पोझिशन तयार केली होती. यामुळे त्यांनी एका दिवसातच 735 कोटी रुपयांचा नफा कमावला, जरी कॅश आणि फ्युचर्समध्ये त्यांना 61.6 कोटींचा तोटा झाला होता.
SEBI च्या म्हणण्यानुसार, हा गैरव्यवहार केवळ एकदाच नाही, तर अनेक वेळा, विशेषतः आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशी करण्यात आला. यामुळे बाजारातील सामान्य गुंतवणूकदार गोंधळून गेले आणि चुकीच्या बाजार संकेतांवर व्यवहार करत नुकसानात गेले.
'स्टॅटेजी बी' अंतर्गत, BANKNIFTY च्या 3 एक्स्पायरी दिवशी त्यांनी फ्युचर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री केली आणि 225 कोटींचा नफा मिळवला. मे 2025 मध्ये NIFTY एक्स्पायरीच्या 3 दिवसांमध्ये त्यांनी लाँग पोझिशन्स घेऊन मोठा फायदा मिळवला.
एकूण 21 व्यापार दिवसांमध्ये, जेन स्ट्रीट ग्रुपने 4,843 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा मिळवला असल्याचे SEBI च्या तपासणीत निष्पन्न झाले.
SEBI कडून कठोर कारवाई
याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये NSE ने जेन स्ट्रीट ग्रुपला चेतावणी देऊनही त्यांनी आपली धोरणे बदलली नाहीत, हे देखील SEBI ने नोंदवले. त्यामुळे बाजारातील स्थैर्य आणि गुंतवणूकदारांचे हित जोखण्याच्या उद्देशाने SEBI ने तातडीने हस्तक्षेप करून ही कारवाई केली.
SEBI ने आदेश दिला आहे की, मिळवलेला संपूर्ण अवैध नफा, म्हणजेच 4,843.57 कोटी रुपये, संबंधित सर्व कंपन्यांकडून संयुक्त व स्वतंत्रपणे वसूल करण्यात यावा आणि तो SEBI च्या ताब्यातील एस्क्रो खात्यात जमा करण्यात यावा.
भविष्यातील व्यवहारांवर निर्बंध
SEBI ने स्पष्ट केले की, जेन स्ट्रीट ग्रुपच्या अशा प्रकारच्या उच्च-जोखमीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्यापार पद्धतींवर भविष्यात निर्बंध लावण्यात येणार आहेत, जेणेकरून बाजाराचा स्थैर्य बिघडू नये आणि सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये.
हेही वाचा