पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अफगाणिस्तान सीमेच्या जवळ सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी मोहीम राबवून 47 दहशतवाद्यांचा नायनाट केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (ISPR) दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या मोहिमांत पार पडली.
पहिली मोहीम 7-8 ऑगस्टच्या दरम्यान रात्री झोब जिल्ह्यातील संबाजा भागात राबवण्यात आली, ज्यात 33 दहशतवादी ठार झाले. दुसरी कारवाई 8-9 ऑगस्टच्या रात्री संबाजा परिसरातच करण्यात आली, ज्यात 14 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दोन्ही मोहिमांत शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा कारणास्तव बलुचिस्तान प्रांतात मोबाईल आणि इंटरनेट सेवा 31 ऑगस्टपर्यंत बंद राहतील. हा निर्णय बलुचिस्तान सरकारच्या विनंतीनुसार घेण्यात आला असून, गृह विभागाने 6 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन तातडीने सेवा स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी यास पुष्टी दिली. पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादी मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर आहे.
गेल्या गुरुवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील वाना तहसीलमध्ये टॅक्सी स्टँडजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले. जखमींमध्ये 3 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा स्फोट पोलिसांच्या गस्ती वाहनाजवळ झाला. नोव्हेंबर 2022 मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यांनी सरकारसोबतचा युद्धविराम संपुष्टात आणल्यानंतर, विशेषतः बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.