Buldhana : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणात आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
बुलढाण्यात पार पडला पक्षप्रवेश सोहळा
हा पक्षप्रवेश सोहळा बुलढाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके, प्रदेश महासचिव अॅड. रोशन गावित, धुळे जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सपकाळ यांनी वळवी यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच नंदुरबार येथे भव्य कार्यक्रम घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनाही औपचारिक पक्षप्रवेश देण्यात येईल.”