छत्रपती संभाजी नगर येथील विधानसभा निवडणूक चांगलीच चर्चेची राहिली. आमदार होण्याचे स्वप्न बऱ्याच जणांनी पाहिले, मात्र काहींचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आताचे मंत्री मात्र तत्कालीन शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे हा उमेदवार दिला. आमदार बनायचं असल्याने राजू शिंदे हे भाजपमधून फक्त विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळेल, म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आले होते. त्यांना अखेर पराजय स्वीकारावा लागला. राजू शिंदे यांचे आमदार होण्याचे स्वप्न मागे राहिल्याने त्यांनी अखेर आता पुन्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र अपयशाचं कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर फोडलं.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले. मी निवडणुकीला उभा असताना संजय शिरसाठ यांना मदत केली. मात्र पक्षातील उमेदवार असताना मला मदत केली नाही, असा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून राजीनामा देत असताना मी चंद्रकांत खैरे यांच्यामुळे राजीनामा देत आहे, असे धडधडीत कारणही राजीनामाच्या पत्रावर लिहिले. मात्र या ठिकाणी शिवसेनेचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे राजू शिंदे यांनी मनापासून आभार मानले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खैरे चिडण्याचे कारण
राजू शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या नावाचे कारण देऊन राजीनामा देत असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राजू शिंदे यांना थेट धमकीच दिली आहे. उमेदवारी चंद्रकांत खैरे यांच्या मुलाला देण्यासाठी हा खटाटोप होता का?, असा प्रश्न उपस्थित केला असता चंद्रकांत खैरे यांनी, "राजू शिंदे असं बोलत असेल, तर त्याच्या कानाखाली मारेल, जे बोलायचं ते समोर येऊन बोल," अशी धमकीच दिली आहे. तसेच, "पक्षात येऊन तुम्ही पक्ष फोडायचं काम केलं, दाढीला केस नसलेल्या चिल्लर माणसाला मी मोजत नाही," असे देखील खैरे संतापात म्हणाले.
राजीनाम्यानंतर जुन्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप
मात्र दुसरीकडे राजू शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनाम्या मागचे कारण चंद्रकांत खैरे हे आहेत, असे पत्रात नमूद केले आहे. मात्र मला पाडण्यासाठी संजय शिरसाठ आणि चंद्रकांत खैरे यांनी एकत्रित येऊन काम केले. यामुळे माझा पराभव झाला अशी नाराजी राजू शिंदे यांनी व्यक्त केली. मात्र चंद्रकांत खैरे यांनी महानगरपालिकेत राजू शिंदे हा जाणीवपूर्वक प्रकल्प पूर्ण करत नव्हता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विषयी वाईट बोलत असल्याने तो संताप माझ्या डोक्यात होता. मात्र मी राजू शिंदेंसाठी निवडणुकीत काम केले ते सुद्धा राजू शिंदेंच्या कार्यकर्त्यांना समोर बसून इतर लोकांना फोन करून राजू शिंदेला मतदान द्या, असे फोन केले, असे देखील केल्याचे खैरे म्हणाले.
राजीनाम्याच्या लेटरचा बॉम्ब
भाजपमधून आमदारकीसाठी संधी असल्याने राजू शिंदे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात आले. नवीन पक्ष, नवीन सुरुवात त्यामुळे भाजपमधून आलेल्या नेत्याला बऱ्याच गोष्टी नव्या होत्या. निवडणुकीत अखेर पराजय स्वीकारावा लागला आणि प्रतिस्पर्धी उमेदवार संजय शिरसाठ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यानंतर आता पक्ष सोडून जात असताना राजू शिंदे यांनी टाकलेल्या राजीनाम्याच्या बॉम्ब नंतर या बॉम्बचा धमाका सर्वत्र चर्चेत आहे.