मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर पुढील तीन महिने मोठा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, याचा थेट परिणाम लोकल तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. या निर्णयामुळे काही लोकल सेवा दादर ते ठाणे दरम्यानच धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कधीपासून कधीपर्यंत ब्लॉक?
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपासून २६ एप्रिल २०२६ पर्यंत (एकूण ८५ दिवस) हा जम्बो ब्लॉक लागू असणार आहे. या कालावधीत सीएसएमटीवरील दोन महत्त्वाचे प्लॅटफॉर्म बंद ठेवण्यात येणार आहेत.
ब्लॉकचे कारण काय?
सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे २,४५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, मुंबईतील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या सीएसएमटीचा चेहरामोहरा बदलण्याचा उद्देश आहे. त्यामुळेच पुढील जवळपास तीन महिने काही प्लॅटफॉर्म सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
कोणते प्लॅटफॉर्म राहणार बंद?
या जम्बो ब्लॉकमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्मवर थांबणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे आता बदलण्यात आले असून, काही गाड्या दादर, ठाणे किंवा कुर्ला येथेच थांबणार आहेत.
कोणत्या एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम?
या बदलामुळे अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटीपर्यंत न जाता दादरपर्यंतच थांबतील. यामध्ये
अमरावती–CSMT एक्स्प्रेस (12112)
बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्स्प्रेस (11002)
हावडा–CSMT एक्स्प्रेस (12810)
भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्स्प्रेस (11020)
बिदर–CSMT एक्स्प्रेस (22144)
लातूर–CSMT एक्स्प्रेस (22108)
मडगाव–CSMT तेजस एक्स्प्रेस (22120)
यांचा समावेश आहे. तसेच मंगळुरू–CSMT एक्स्प्रेस (12134) ही गाडी ठाण्यापर्यंतच धावणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
पुनर्विकास प्रकल्पात काय असणार?
सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ४,६१,२३४ चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये
प्रवाशांसाठी स्वतंत्र आधुनिक इमारती
मेल-एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनना जोडणारे डेक
नवे पादचारी पूल आणि स्कायवॉक
पार्सल सेवा आणि व्यावसायिक सुविधा
यांचा समावेश असेल. हे काम पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी स्थानक अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-स्नेही होणार आहे.
एकीकडे प्रवाशांना पुढील तीन महिने थोडा त्रास सहन करावा लागणार असला, तरी दीर्घकालीन दृष्टीने हा प्रकल्प मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.