बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान आपल्या खास स्टाईलसाठी आणि विनोदी उत्तरांसाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर #AskSRK सेशन घेतलं. यामध्ये चाहत्यांनी त्याला मजेशीर, अजब-गजब प्रश्न विचारले. मात्र एका युजरने थेट शाहरुखला रिटायर होण्याचा सल्ला दिला. त्यावर शाहरुखने दिलेलं मजेशीर उत्तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे.
एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘भावा तुझं वय झालं आहे, रिटायर हो. इतर कलाकारांना संधी दे.’ यावर शाहरुखने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे, तो म्हणतो ‘भाऊ, जेव्हा तुझ्या प्रश्नांचा अल्लडपणा संपेल, तेव्हा एखादा चांगला प्रश्न विचार. तोपर्यंत कृपया तात्पुरत्या निवृत्तीत राहा.’ शाहरुखच्या या भन्नाट उत्तराने नेटकऱ्यांची बोलतीच बंद झाली.
याच सेशनमध्ये एका युजरने शाहरुखला त्याच्या खांद्याच्या दुखापतीबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘मी प्रसिद्धीचा भार चांगलाच सहन करतोय. खांदा हळूहळू बरा होतोय. विचारल्याबद्दल धन्यवाद.’ काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना शाहरुख हातावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत दिसला होता.
दरम्यान, एका चाहत्याने त्याच्या मुलगा आर्यन खानच्या आगामी वेब सीरिजबद्दल विचारलं. त्यावर शाहरुख म्हणाला, ‘इतके लोक विचारत आहेत की मला नेटफ्लिक्सला सांगावे लागत आहे, माझा मुलगा एक कार्यक्रम बनवतोय, मी वडील म्हणून फक्त त्याची वाट पाहत आहे.
नेटफ्लिक्स, तुम्ही काय करत आहात?’ शाहरुखच्या या मजेशीर ट्विटला नेटफ्लिक्सनेही उत्तर दिलं, ‘मुलाचा टीझर पोस्ट करण्यापूर्वी त्याच्या वडिलांची परवानगी आवश्यक होती. फर्स्ट लूक उद्या येईल.’शाहरुखच्या या संपूर्ण संवादाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो केवळ सुपरस्टार नाही तर चाहत्यांशी जिव्हाळ्याने जोडलेला अभिनेता आहे.