बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अलिबाग तालुक्यातील थळ गावात झालेल्या जमीन खरेदीमुळे वादात सापडली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आलेली जमीन नियमांचे उल्लंघन करून विकली गेल्याचे समोर आले असून या व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी अलिबाग तहसीलदारांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
थळ येथील सर्व्हे नंबर 354/2 मधील सुमारे 0.60.70 हेक्टर जमीन 1968 मध्ये नारायण विश्वनाथ खोटे यांना लागवडीसाठी देण्यात आली होती. त्यावेळी विक्री किंवा हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, या अटीकडे दुर्लक्ष करून 2023 मध्ये जवळपास 12 कोटी 21 लाख रुपयांचा व्यवहार करून जमीन सुहाना खानच्या नावावर झाल्याचे उघड झाले आहे.
या परवानगीशिवाय झालेल्या व्यवहारामुळे प्रकरण गंभीर मानले जात आहे. जिल्हा प्रशासन चौकशी करत असून अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. अलिबाग परिसर गेल्या काही वर्षांत सेलिब्रिटींसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. यापूर्वी शाहरुख खानसह अनेक कलाकार आणि खेळाडूंनी येथे जमीन व बंगल्यांची खरेदी केली आहे.
मात्र सुहाना खानच्या नावावर झालेल्या जमिनीच्या खरेदीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर होणार असून त्यानंतर या वादग्रस्त व्यवहाराचे भवितव्य ठरेल.