शिवसेना (शिंदे गट) यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणी आज सकाळी 10 वाजता मुंबईतील माझगाव न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शायना एन. सी. यांनी अरविंद सावंत यांनी केलेल्या कथित वक्तव्याला आक्षेप घेत न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी केलेले वक्तव्य हे अपमानास्पद असून महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे महिला सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, अरविंद सावंत यांनी या आरोपांचा इन्कार केला असून हे प्रकरण राजकीय द्वेषातून उभे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. उबाठा गटाकडूनही या कारवाईवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत न्यायालय पुढील कारवाईबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील टप्पा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते अरविंद सावंत?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं 'इम्पोर्टेड माल' चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यानंतर पूर्वीं सावंत यांनी माफी देखील मागितली होती मी महिलांचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी केलं. अरविंद सावंत यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. याबाबत त्यांनी माफी मागितली आहे.