Thane Mahanagara Palika : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागातील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईने ठाणे महापालिकेत प्रचंड खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. न्यायालयीन चौकशीत असलेल्या अनधिकृत बांधकामांदरम्यानच हा भ्रष्टाचार उघड झाल्याने प्रशासनाची प्रतिमा धोक्यात आली आहे.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पाटोळे यांच्यासह ओमकार गायकर यालाही अटक करण्यात आली. गुरुवारी सुट्टी असल्याने शुक्रवारी कामकाज सुरू झाल्यावर संपूर्ण मुख्यालयात या घटनेची चर्चा रंगली. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पदावर आता स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे.
ठाण्यातील अतिक्रमण विभागावर आधीपासूनच वाद आणि भ्रष्टाचाराच्या छाया आहेत. दिवा, मुंब्रा आणि कळवा विभागांतील अनधिकृत बांधकामांप्रमाणेच येथेही वाद कायम असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. यापूर्वीही या विभागातील अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत वादग्रस्त प्रकरणे समोर आली होती.
या प्रकरणात तक्रारदाराशी संपर्क साधणारे मंदार गावडे, सुशांत सुर्वे आणि संतोष तोडकर या तिघांची नावे तक्रारीत नमूद आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या खात्यातून सुर्वे यांच्या बँकेत दहा लाख रुपये वर्ग झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक होऊनही जुन्या कारभार्यांचा प्रभाव कायम असल्याचा संशय बळावला आहे. पालिका वर्तुळात आता या संवेदनशील पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.