राज्याच्या राजकारणात आणि उद्योगविश्वात चर्चेचा विषय ठरलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उद्योगपती गौतम अदानी एकाच मंचावर, तेही अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात दिसत आहेत. विशेष म्हणजे, हे कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचे चित्र नसून, साताऱ्यातील एका शाही लग्नसोहळ्याचे आहे.
कोणाच्या लग्नात जमले हे दिग्गज?
साताऱ्यात नुकताच आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांच्या कन्या प्राजक्ता पवार आणि हिमांशू यांच्या विवाह सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला. या समारंभाला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह उद्योगक्षेत्रातील मोठमोठी नावेदेखील उपस्थित होती.
स्वतः शरद पवार यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं “आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.”
शाही सोफ्यावर पवार-अदानी, बाजूला मुख्यमंत्री फडणवीस
फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या फोटोत शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी एकाच सोफ्यावर बसलेले दिसतात, तर त्यांच्या जवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. राजकारणात नेहमी वेगवेगळ्या भूमिकांवर असणारे हे तिघे एकाच फ्रेममध्ये दिसल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
एमसीए निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र
या व्हायरल फोटोकडे पाहताना राजकीय पार्श्वभूमीही महत्त्वाची ठरते. काही दिवसांपूर्वीच मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या निवडणुकीत शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्या वेळी पवारांनी सार्वजनिकपणे फडणवीसांचं कौतुक केलं होतं. आणि आता काही दिवसांतच दोघे पुन्हा एकाच कार्यक्रमात, तेही अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
शाही सोहळ्याचा राजकीय ‘फ्रेम’
साताऱ्यात झालेला हा विवाहसोहळा प्रशासकीयदृष्ट्या प्रतिष्ठित मानला जातो. राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी, राजकारणी आणि उद्योजक या कार्यक्रमाला हजर होते. मात्र, सोशल मीडियावर ज्याने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली ती म्हणजे,, पवार-अदानी-फडणवीस या तिघांची एकत्र फ्रेम! त्यामुळे काहींनी या भेटीला ‘राजकारणाच्या पलीकडील स्नेहभेट’ म्हणून संबोधलं आहे, तर काहींनी ‘राजकीय संकेत’ म्हणून पाहिलं आहे.