काल शरद पवारांच्या पक्षाची शॅडो कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला खासदार आणि आमदारांची उपस्थिती बघायला मिळली. यावेळी पक्षवाढीसाठी काही खास निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांवर तसेच विभगांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ही बैठक काल मुंबईमध्ये पार पडली.
या बैठकीसाठी जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती अखण्यात आली आहे. जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारीही बदलले जाणार आहेत.
या बैठकीबाबत पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली. तसंच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं असून 7-8 मार्चपासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनंही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे."