मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिली भेट असल्यामुळे याचे महत्व वाढले आहे. तसेच, सध्या दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतांवरही चर्चा जोरदार सुरु आहे.
या भेटीला शरद पवारांसोबत रोहित, पार्थ, जय, श्रीनिवास, राजेंद्र यांसह पवार कुटुंबातील जवळपास सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. फक्त सुप्रिया सुळे ह्या वेळी उपस्थित नव्हत्या. भेट साधारण अर्धा तास चालली आणि त्यानंतर शरद पवार सहयोग सोसायटीहून गोविंदबागेकडे रवाना झाले.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे की, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गट विलीन होणार आहेत का? सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत फक्त विलिनीकरण नव्हे तर अजित पवारांच्या स्मारकाच्या नियोजनाबाबत आणि काही सहकारी संस्था, इतर राजकीय बाबींवरही चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर आता राजकीय विश्लेषक आणि पक्षीय वर्तुळात नव्या टप्प्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.