शरद पोंक्षे यांच्या पुरूष या नाटकाचा प्रयोग बीडमध्ये पार पडला. त्यानंतर त्यांनी बीडमधील नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत खंत व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, अतिशय अप्रतिम रसिक प्रेक्षक आहेत आणि या रसिक प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब प्रवास करून येत असतो. गंभीर विषयावरचा एक नाटक इतका चांगला प्रतिसाद इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही ते रिसिव्ह करताय त्यासाठी खरोखरच तुमचं कौतुक. पण रसिक हो, पुन्हा पुन्हा इथे येणं आम्हाला शक्य होणार नाही कारण या नाट्यगृहाची दुरावस्था. इतकी भयानक दुरावस्था आहे. एसी थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून 21 हजार रुपये घेतले जाते. पण एसीच नाही. मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं नाही.
इथे बाथरूम नाही, बाथरूमची अवस्था इतकी भीषण आहे की महिला कलाकारांना तिथे जाणंच शक्य नाही. मेकअपरूम नाही स्वच्छता नाही. या नाट्यगृहाला वालीच नाही. आज शासनाचे खूप मोठे अधिकारी इथे बसलेत त्यांनी दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती.हे नाट्यगृह ज्यांच्या कोणाच्या अंडर येत असेल तर त्यांना बोलावून सांगा की, जर अशीच नाट्यगृहाची अवस्था ठेवली, तर दर्जेदार नाटक आणि कलाकारांपासून बीडचे रसिक प्रेक्षक मुकतील.
माझी इच्छाच नाही आहे परत इथं येण्याची . मी बीडला येईन, बीडला नक्की येईल, पण या थेटर मध्ये येऊन नाटक करावं अशी आमची इच्छा आज मेली आहे. खूप भयानक परिस्थिती आहे. नाट्य रसिकांची सुद्धा नागरिक म्हणून तुमची पण एक जबाबदारी आहे तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण बीडमध्ये चांगलं नाटक येणे बंद होईल. अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत.
या सगळ्यावर मात करुन आम्ही नाटक करतोय. या बोलण्याचा काही परिणाम होणार नाही याची मला गॅरंटी आहे. मी या विषयावर 1000 वेळा बोलून झालोय पण राहवत नाही. बीडचे प्रेक्षक दर्जेदार नाटकांना मुकतील. जोपर्यंत हे सर्व व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शरद पोंक्षेंचं नाटक मी इथं आणू शकत नाही. असे शरद पोंक्षे म्हणाले.