मराठी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारने त्रिभाषा धोरण रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेतील शिंदे गटाने ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत, मातोश्री परिसरात आक्रमक बॅनरबाजी केली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा कलानगर व मातोश्री परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्समधून ठाकरे गटावर "दुटप्पी भूमिकेचे" आरोप करण्यात आले आहेत. मराठीसाठी खंबीर भूमिका घेत असल्याचा दावा करत शिंदे गटाने, "सत्य बाहेर आलं, घशात गेले दात...", अशा टोलेबाज भाषेत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच, "त्रिभाषा सूत्र तुम्हीच मान्य केलं होतं, विसरलात का?", असा सवालही विचारण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून ही बॅनरबाजी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ठाकरे गट आणि मनसेकडून 5 जुलैला विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुमारे 20 वर्षांनंतर एकत्र मंचावर येणार असल्याने, या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
हेही वाचा