मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला आहे. याचपार्श्वभूमिवर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती संदीप शिंदे आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले असून त्यांनी जरांगेंची भेट घेतली.
जरांगेंच्या भेटीनंतर पुन्हा उपसमितीची बैठक भरवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान शिंदे समितीने 2 लाख 39 हजार प्रमाणपत्र मान्य केल्याची माहिती जरांगेंना दिली. या भेटी दरम्यान कोकण विभागीय आयुक्तही उपस्थित होते. दरम्यान जरांगे आणि शिंदे समितीच्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याचं पाहायला मिळाल असून मनोज जरांगेंकडून उपोषणातून माघार घेण्यास नकार देण्यात आला आहे.
त्यामुळे शिंदे समिती आणि जरांगेंमधील चर्चा निष्फळ ठरली आहे. तसेच यावेळी जरांगे म्हणाले की, "आरक्षण देण्याचं काम शिंदे समितीचं नाही, सरकार उगाच शिंदे समितीला पुढे करतंय. सरकारनं चर्चेसाठी यायचं तर शिंदे समितीला पाठवलं जातंय. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि सरकारचाही अपमान आहे". राज्य मंत्रिमंडळाने चर्चा करणं अपेक्षित असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.