राज्यातील नगरपालिका आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील 32 प्रभागांमधील 128 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
बारणे म्हणाले, “महायुतीचा घटक पक्ष म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा शक्य आहे. पण महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही. विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आमची युती होणार नाही.” त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की महायुतीत ताळमेळ न झाल्यास शिवसेना स्वबळावर उतरायला पूर्णपणे तयार आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना युतीचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीने शरद पवार गटाच्या बैठकित स्पष्ट निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची नाही. ठाकरे गट आणि काँग्रेस यांनीही ही भूमिका तुषार कामठे यांच्याकडून निश्चित करून घेतली आहे.
यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की स्वतंत्रपणे लढतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाची स्वबळावर उमेदवारी आणि दोन राष्ट्रवादींची अंतर्गत चर्चा यामुळे पिंपरी चिंचवडमधील आगामी महापालिका निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.