महायुतीत राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा केली आहे. मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महापालिकेत महायुती म्हणून लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. गुरुवारी रात्री, दोन तास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. महत्त्वपूर्ण बैठकीत तिढा सोडवला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत युतीबाबत महत्त्वाची घोषणा केली.
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, “शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणताही संभ्रम नाही. आम्ही पालिका निवडणुका एकत्र, ठामपणे आणि ताकदीने लढणार आहोत.” त्यांच्या या विधानाने महापालिकांतील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उमेदवारांची निवड, प्रभागनिहाय रणनीती आणि जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यांसह प्रमुख शहरांमध्ये ‘महायुती’ची संयुक्त मोहीम राबवण्याचा संपूर्ण आराखडा तयार केला जात आहे.