Uddhav Thackeray : राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे पक्ष रणनिती आखण्यात गुंतलेले असतानाच, शिवसेना (शिंदे गट) नेत्या शितल म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नुकतीच शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. यात ठाकरे गटाने संघटन सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबतचे संकेत दिले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या चर्चेला अधिक उधाण आले होते.
मात्र या घडामोडींवर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शितल म्हात्रे म्हणाल्या, “सध्या पितृपक्ष सुरू आहे. तो संपताच मोठे धक्के आणि गौप्यस्फोट होतील. ठाकरे गटासाठी येणारे दिवस कठीण ठरणार आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
याशिवाय त्यांनी टोला लगावत म्हटलं, “राज ठाकरे यांनी युतीबाबत अजून एक शब्दही उच्चारलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, त्यामुळेच अशी विधानं होत आहेत. संजय राऊत वारंवार दिघे साहेबांबाबत बोलतात, पण त्यांच्या आरोपांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसा खाल्ला, त्यांनी आम्हाला बोध देऊ नये.”
शितल म्हात्रेंच्या या दाव्यानंतर ठाकरे गटात हालचाल सुरू झाली असून, पितृपक्षानंतर नेमकी कोणती राजकीय घडामोड उलगडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नाट्यमय कलाटणी होण्याची चिन्हे आहेत.