Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti
ताज्या बातम्या

Sanjay Raut : ठाकरे बंधू युतीबाबत संजय राऊतांचं मोठं भाष्य म्हणाले...

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत दुजोरा मिळू लागला आहे.

Published by : Riddhi Vanne

Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत दुजोरा मिळू लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची घोषणा १०० टक्के होणार असून ती एकत्रितपणे, धूमधडाक्यात आणि वाजत-गाजत केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.

युतीसाठी कोणता ठरावीक मुहूर्त काढण्यात आला आहे का, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, “असा कोणताही खास मुहूर्त ठरवलेला नाही. मात्र हा एक नवीन आणि महत्त्वाचा राजकीय प्रयोग आहे, हे मी कालच स्पष्ट केले होते.” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पक्ष एकत्र येत असून, आगामी निवडणुका संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित राहणार नाही. ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणुका लढवणार आहेत. “या सर्व ठिकाणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा पूर्ण झाली असून, आज दिवसभरात या निर्णयावर शेवटचा हात फिरवला जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या युतीकडे ‘नाटक’ म्हणून पाहिले जात असल्याच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “हा काही नाटकाचा प्रयोग नाही. कोणी याला नाटक म्हणत असेल, तर त्यांनी हे लक्षात घ्यावे की हा नाटक नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठीचा प्रीती संगम आहे. आणि या प्रीती संगमामध्ये महाराष्ट्राची जनता सहभागी होणार आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवरून सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. “काल लागलेले निकाल म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचे नाटक होते. जसे काही नाटकांची तिकिटे खिडकीवरून संपतात, तर काही नाटकांमध्ये मालक स्वतःच तिकिटे विकत घेऊन रिकाम्या थिएटरसमोर शो करतात,” असा टोला त्यांनी लगावला.

“कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसा खर्च करून तिकिटे विकत घेतली गेली, वाटली गेली. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये कोणी खर्च केले, हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलेच माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हेलिकॉप्टर चार्टर करून प्रचार केल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकूणच, शिवसेना,मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, येत्या काळात या ‘नव्या प्रयोगा’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा