थोडक्यात
ठाण्यातील नेत्यावर एकनाथ शिंदे नाराज
पक्षाच्या बैठकीतील निर्णयानंतर मोठी घोषणा
भाजप व एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेत चुरस
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षात सध्या स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावरून रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून महायुती एकत्र निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मध्येच आता काही ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षात मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं दावा केला जात आहे. त्यातच आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजप व एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेत चुरस पहावयास मिळत आहे.
ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचा दावा केल्यानंतर लगेचच शिंदेंच्या नेत्यांनी बैठक घेऊन शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. मात्र, या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज झाले आहेत. त्यांनी या निर्णयानंतर मोठी घोषणा करीत येत्या काळात अशाप्रकारचा निर्णय जाहीर केल्यास त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची धावपळ सुरु आहे. स्थानिकच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र पदाधिकारी स्वबळाचा नारा देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता जागोजागी महायुतीवरून संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून (BJP) राज्यभरात प्रत्येक विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुका लढवणार, तर काही ठिकाणी शक्य नसेल तिथे मैत्रिपूर्ण लढत होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतरही ठाणे महापलिका निवडणुकीवरून रणकंदन पाहवयास मिळत आहे. याठिकाणी भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर लगेचच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली.