थोडक्यात
शिवसेना ठाकरे गटाने आज शिवाजी पार्कवर आंदोलन केले.
संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांनी “खेळाकडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे” असे मत व्यक्त केले होते.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी “खेळाकडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे” असे मत व्यक्त केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका करत “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहते, ते अर्धे पाकिस्तानी आहेत” असे वक्तव्य केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचा उल्लेख करत राऊत यांनी, “जर बळी गेलेल्यांमध्ये तुमच्या घरातील एखादा असता तर तुम्ही असे बोललाच नसतात” असा सवाल उपस्थित केला.
राऊत यांनी यावेळी केवळ अजित पवारांनाच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. शिंदे यांचा पक्ष हा पक्ष नसून अमित शहा यांच्या नियंत्रणाखालील एक छोटी कंपनी असल्याची टीका त्यांनी केली. “देशाच्या भावना आज वेगळ्या आहेत आणि हे नेते मात्र पाकिस्तानसोबत सामना होऊ द्यावा, अशी भाषा वापरत आहेत” असे राऊत म्हणाले.
याशिवाय राऊतांनी बीसीसीआय, भाजपा आणि जय शाह यांच्यावरही आरोप केले. भारतीय क्रिकेट संघाला प्रत्यक्षात सामना खेळायचा नसून काही खेळाडू या सामन्याला विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र संघावर दबाव आणला जात असल्यामुळे खेळाडूंना सामना खेळावा लागत असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने “माझे कुंकू, माझा देश” या घोषवाक्याखाली राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने आयोजित करण्याला विरोध करत देशातील जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन राबवले जात असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.