शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात. अशातच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन शिंदे गटाच्या नेत्या डॉ.निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सध्या दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यावेळी निलम गोऱ्हे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, "शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडिज दिल्या की पदं मिळायची", असा आरोप त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर -
निलम गोऱ्हे यांनी आरोप केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीदेखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना सोडून गेलेल्यांबद्दल आम्ही बोलत नाही असं ठाकरे म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले की, "जाऊद्या, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्या महिला म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांनी राजकारणात चांगला नाव कमावलं आहे. गद्दार सेनेमध्ये गेलेल्यांबद्दल मी बोलत नाही. शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल. पण माझी जुनी माणसं, निष्ठावंत माणसं माझ्याबरोबर आहेत".