(Uddhav Thackeray ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आमदारांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. सत्तेत सुरू असलेल्या अंतर्गत तणावाचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर कोपरखळी मारली. “विरोधी पक्षाचा आमदार निधी मागायला गेला की मुठी आवळल्या जातात, पण आता तर सरकारमध्येच एकमेकांच्या नसा आवळल्या जातायत,” असे वक्तव्य करत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. याच मुद्द्यावर पुढे टीका करत ठाकरे म्हणाले...
“आयुष्यात चांगला शिक्षक आणि चांगलं शिक्षण मिळालं नाही तर माणसाचं काय होतं हे आपण बघतो. दिवटी म्हणजे मशाल असते, आणि दिवटा म्हणजे वेगळाच प्रकार… असे काही दिवटे आहेत ज्यांना मशालीचं महत्त्व कधीच कळणार नाही.” त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सरकारमधील तणावाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “आजच वाचलं कुणीतरी दिल्लीला धाव घेतली, ‘बाबा मला मारलं’ म्हणून. ही पातळी किती खाली गेली आहे याचा अंदाज यावरून येतो. चांगला शिक्षक मिळाला असता तर अशी लाचारी निर्माणच झाली नसती.” उद्धव ठाकरेंच्या या तीव्र टीकेतून त्यांनी सत्तेतील गोंधळ, अंतर्गत कलह आणि नेतृत्वाच्या कमकुवतपणावर थेट निशाणा साधल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या “दिवटे” आणि “मशाल” या उपमांनी सत्ताधारी गटावर प्रखर प्रहार झाला असून राज्याच्या राजकारणात या विधानाची जोरदार चर्चा रंगण्याची शक्यता आहे.