मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपदाची निवड होईपर्यंत कोणताही अनपेक्षित राजकीय धक्का बसू नये, यासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आज दुपारी तीन वाजता बांद्रा येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजल्यानंतर सर्व नगरसेवकांना वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेण्यात येणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई महापौर निवडीपर्यंत शिवसेनेत ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर निवडीदरम्यान फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी आणि सर्व नगरसेवक एकत्र ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याआधीही राज्यातील विविध निवडणुकांच्या काळात अशा प्रकारचे राजकीय डावपेच पाहायला मिळाले आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबई महापालिकेचा महापौर हा पद केवळ औपचारिक नसून, शहराच्या राजकारणात मोठे महत्त्व असलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपले संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. शिवसेनेने नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतल्याने महापौर निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, महापौर निवड पूर्ण होईपर्यंत ही खबरदारी कायम ठेवली जाणार आहे. मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत महापौर निवडीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.